महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पिंपरी चिंचवड शहरातील विविध बँकांना कडक इशारा दिला आहे की, मराठी भाषेचा वापर टाळणाऱ्या बँकांवर आता मनसे स्टाईल कारवाई केली जाईल! राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्व वित्तीय संस्था, बँका, उद्योग व आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा सक्तीने वापर करण्याचे बंधन आहे. मात्र, तरीही काही बँका या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट बँकांना निवेदन देत मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
पिंपरी चिंचवडमधील बँकांवर मनसेचा दबाव!
पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख बँकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. त्यामध्ये ICICI बँक (पिंपरी शाखा), बँक ऑफ इंडिया (पिंपरी शाखा), DBS बँक (चिंचवड शाखा), IDFC फर्स्ट बँक (पिंपरी शाखा), RBL बँक (पिंपरी शाखा), बँक ऑफ बडोदा (पिंपरी चिंचवड शाखा) आणि HDFC बँक (पिंपरी शाखा) यांचा समावेश आहे.
मनसेचा थेट इशारा – मराठीसाठी लढा सुरूच राहील!
या निवेदनात स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व वित्तीय संस्था, आस्थापना, कार्यालये आणि बँकांमध्ये मराठीत व्यवहार होणे अनिवार्य आहे.
🔹 ग्राहकांशी मराठीतून संवाद करणे बंधनकारक आहे. 🔹 सर्व अर्ज, निवेदने व माहिती फलक मराठीत असावेत. 🔹 बँकांमध्ये मराठी जाणणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
इतके असूनही, काही बँका आणि त्यांचे अधिकारी मराठी भाषेला जाणूनबुजून नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार मनसेला मान्य नाही आणि अशा बँकांवर कठोर पावले उचलली जातील.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे कोणीही तिचा अपमान करणार असेल तर मनसे अशांना त्यांची जागा दाखवून देईल. यापूर्वीही मनसेच्या आग्रहानंतर सरकारने मराठीसाठी नियमावली तयार केली होती. मात्र, काही बँका अजूनही इंग्रजीला अधिक प्राधान्य देत आहेत.
मनसेच्या इशाऱ्यानंतर बँक प्रशासनाने त्वरित योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाची तयारी ठेवावी, असा कडक इशारा देण्यात आला आहे.
मनसेच्या निवेदनावेळी हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
बँकेच्या शाखाप्रमुखांना निवेदन देण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपाध्यक्ष राजू सावळे, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे, नारायण पठारे, अविनाश तरडे, संतोष यादव, आकाश सागरे, विक्रम भोसले, प्रदुत कांबळे, प्रज्वल गायकवाड, आकाश कांबळे, मनोज लांडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.