Home Breaking News भावनिक संवादात आसावरी जगदाळेचा संताप अनावर; शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली भयावह...

भावनिक संवादात आसावरी जगदाळेचा संताप अनावर; शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली भयावह घटनेची साक्ष!

107
0

पाहुणचाराने निघालेलं कुटुंब मातमात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याने उद्ध्वस्त झालेलं जगदाळे कुटुंब

पुणे – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार स्वतः कर्वेनगर येथील त्यांच्या राहत्या घरी पोहोचले आणि शोकाकुल कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं.

यावेळी जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली व्यथा आणि संताप अत्यंत भावनिक शब्दांत व्यक्त केला.

“डोळ्यात गोळ्या घातल्या… काही विचारलंच नाही!”

आसावरीने थेट सांगितलं की, “तो थेट आला आणि गोळ्या झाडल्या… काहीही विचारलं नाही. मास्क घालून आले होते. ‘शेर आला, शेर आला’ असं म्हणत लोक पळाले. आम्ही चिखलात पडलो. कोणीच मदतीला नव्हतं. तिथे कुठलाही सुरक्षा कर्मचारी नव्हता!”

ती पुढे म्हणाली, “ते पाच जण होते. मी त्यांचा चेहरा देखील पाहू शकले नाही. त्यांनी डोळ्यांत गोळ्या झाडल्या. लहान मुलांनाही सोडलं नाही. अशा लोकांना तशाच गोळ्या घाला! हे पर्यटन बंद करा, स्थायिक बंदोबस्त करा. हे सरकार, प्रशासन काय करतंय?”

“आम्हाला नवऱ्याचा चेहराही पाहता आला नाही…”

संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्यासमोर अश्रूंनी व्यथित होत सांगितलं, “काश्मीरमध्ये आम्हाला नवऱ्याचा चेहरा पाहू दिला नाही. आता पुण्यात आलं तरीही उघडू देत नाहीत. डोक्यात गोळी मारली. आमच्यासाठी काहीतरी करा. आम्हाला त्या दहशतवाद्यांचे मृतदेह दाखवा!”

शरद पवार यांनी या भावनिक संवादात संयम राखत कुटुंबाला धीर दिला. त्यांनी सांगितलं की, “ही घटना अत्यंत निंदनीय आहे. आपण केंद्र सरकारकडे ठोस पावलं उचलण्यासाठी पाठपुरावा करू.”

जगदाळे कुटुंबाच्या वेदनेने संपुर्ण पुणे हादरले

संतोष जगदाळे हे केवळ व्यावसायिक नव्हते तर समाजात सक्रिय असलेले आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेक मित्रांचे सहकार्याने सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला होता. त्यांच्या अकस्मात निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.