Home Breaking News भारताच्या विमान प्रशिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती! पुण्यातील ‘यो स्काईज’ संस्थेने विकसित केला...

भारताच्या विमान प्रशिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती! पुण्यातील ‘यो स्काईज’ संस्थेने विकसित केला स्वदेशी एअरबस A320 सिम्युलेटर

78
0

पुणे | बाणेर

भारतातील विमान प्रशिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत, बाणेर येथील यो स्काईज एव्हिएशन इन्स्टिट्यूट यांनी विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी एअरबस A320 फ्लाइट सिम्युलेटरचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वतः या अत्याधुनिक सिम्युलेटरवर विमान चालवण्याचा थरारक अनुभव घेतला.

भारतातील एव्हिएशन क्षेत्राला नवे बळ

उद्घाटनप्रसंगी मंत्री मोहोळ म्हणाले, “हा सिम्युलेटर केवळ भारतात तयार झालेला पहिला फ्लाइट सिम्युलेटर नाही, तर भविष्यात भारतीय वैमानिकांना उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमामुळे देशी बनावटीच्या तंत्रज्ञानाला चालना मिळेल आणि भविष्यात विमान प्रशिक्षण अधिक प्रभावी होईल.”

संपूर्ण भारतीय अभियंत्यांनी बनवलेला सिम्युलेटर

‘यो स्काईज’चे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट यांनी सिम्युलेटरविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा संपूर्ण सिम्युलेटर भारतीय अभियंत्यांनी डिझाइन आणि विकसित केला आहे. त्याचा उत्पादन खर्च आयात केलेल्या सिम्युलेटरच्या तुलनेत तब्बल ७५% कमी आहे, त्यामुळे तो अधिक किफायतशीर व उपयुक्त ठरेल.

प्रशिक्षणासाठी नवे पर्व सुरू!

यावेळी मंत्री मोहोळ यांनी सिम्युलेटरच्या वापराबाबत एक महत्वपूर्ण सूचना केली. “भारतातील प्रत्येक विद्यार्थी पायलटसाठी सिम्युलेटर प्रशिक्षण अनिवार्य असले पाहिजे,” असे मत त्यांनी मांडले आणि ते यासंबंधी आवश्यक पावले उचलतील असेही सांगितले.

महिला वैमानिकांसाठी प्रेरणादायी पाऊल

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले की, “भारत विविध क्षेत्रांमध्ये पुढे जात आहे आणि महिला वैमानिक बनून आकाशात झेप घेत आहेत, हे अत्यंत अभिमानास्पद आहे.”

जीतो अपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी यांनीही कॅप्टन तृप्ती कर्नावट यांचे विशेष कौतुक करत सांगितले की, “त्यांनी अमेरिकेत उड्डाण करून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. नवीन पिढीला योग्य दिशा मिळाल्यास ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतील.”

भारताच्या हवाई प्रशिक्षणासाठी मैलाचा टप्पा

कॅप्टन तृप्ती कर्नावट यांनी या सिम्युलेटरच्या विशेष क्षमतांबद्दल माहिती देताना सांगितले की, या सिम्युलेटरच्या मदतीने जगातील सर्वात कमी वयाच्या पायलटला स्टुडन्ट पायलट लायसन्स (SPL) मिळवून देण्यात आले.

संपूर्ण देशभरात नावाजलेला उपक्रम

या ऐतिहासिक उपक्रमाच्या उद्घाटनाला शैक्षणिक, औद्योगिक आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. या सिम्युलेटरमुळे भविष्यात भारतीय वैमानिकांना अधिक व्यावहारिक आणि प्रभावी प्रशिक्षण मिळेल, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला.

भारतीय विमान प्रशिक्षण क्षेत्रासाठी हा नवा अध्याय ठरेल!
“मेड इन इंडिया” तंत्रज्ञानाचा अभिमान असावा!