Home Breaking News पुणे मेट्रो लाईन ३ चे काम पुन्हा लांबणीवर; आता मार्च २०२६ पर्यंत...

पुणे मेट्रो लाईन ३ चे काम पुन्हा लांबणीवर; आता मार्च २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार?

78
0

पुणे – शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो प्रकल्पाच्या (मेट्रो लाईन ३) कामाला पुन्हा एकदा विलंब होण्याची शक्यता आहे. या महत्त्वाकांक्षी २४ किलोमीटर लांब मेट्रो मार्गाची पूर्णता आता मार्च २०२६ पर्यंत ढकलली जाण्याची शक्यता असून, या विलंबामुळे पुणे विद्यापीठ चौकात दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना अजून एका वर्षासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

टाटा समुहाच्या टीआरआयएल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. आणि सायमन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने उभारला जात असलेला हा प्रकल्प सध्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) देखरेखीखाली सुरू आहे.

या प्रकल्पाच्या अलीकडेच फेब्रुवारी २०२५ पासून मुदत वाढवून सप्टेंबर २०२५ करण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे.

पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, “मेट्रो लाईन ३ च्या कामाच्या मुदतवाढीबाबत मागणी प्राप्त झाली आहे. मात्र, अंतिम निर्णय अन्य अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठकीनंतर आणि प्रत्यक्ष कामाच्या पाहणीअंती घेतला जाईल.”

या मेट्रो मार्गावर एकूण २३ स्थानके प्रस्तावित आहेत, ज्यात मेगापोलिस सर्कल, एम्बसी क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोलर, इन्फोसिस फेज २, विप्रो फेज २, पॉल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, निकमार, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि सिव्हिल कोर्ट यांचा समावेश आहे.

या प्रकल्पाला मिळालेला विलंब नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असून, विशेषतः माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गासाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.

याशिवाय, वाहनांची वाढती संख्या, रस्ते अरुंद होणे आणि सतत चालणारी खोदकामं यामुळे पुणे विद्यापीठ चौक, बाणेर, बालेवाडी आणि हिंजवडी या परिसरातील रहदारीत प्रचंड गोंधळ निर्माण होत आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांची प्रमुख मागणी आहे की, मेट्रो प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करून वाहतूक समस्यांपासून दिलासा मिळवावा. परंतु, वारंवार मुदतवाढीच्या मागण्या नागरिकांच्या संयमाची कसोटी पाहत आहेत.