Home Breaking News पीसीसीओईला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार – शैक्षणिक क्षेत्रात मोठा सन्मान!

पीसीसीओईला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार – शैक्षणिक क्षेत्रात मोठा सन्मान!

30
0

पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला (PCCOE) भारत सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्लीतील भव्य सभारंभात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते पीसीसीओईच्या प्रतिनिधींचा विशेष सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारी पीसीसीओई ही महाराष्ट्रातील एकमेव खासगी संस्था असून, शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या संस्थांच्या यादीत तिचा समावेश करण्यात आला आहे.

बौद्धिक संपदेच्या जतनासाठी पीसीसीओईचे महत्त्वपूर्ण योगदान!

राष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) पुरस्कार दरवर्षी भारतातील बौद्धिक संपत्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि उद्योगांना प्रदान केला जातो. यामध्ये पेटंट, ट्रेडमार्क, डिझाईन आणि नवीन संशोधनाचा समावेश असतो. पीसीसीओईच्या पेटंट सुविधा कक्षाने (PFC Cell) बौद्धिक संपदेच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले असून, संस्थेने आतापर्यंत 65 पेटंट अर्ज दाखल केले असून त्यापैकी 24 पेटंट मंजूर झाले आहेत. उर्वरित पेटंट गेल्या तीन वर्षांत यशस्वीरित्या प्रकाशित करण्यात आले आहेत.

नवी दिल्लीत भव्य सोहळा – पीसीसीओईचा सन्मान

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क महानियंत्रक यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पीसीसीओईचे पेटंट कक्ष अधिकारी डॉ. उज्वल शिरोडे आणि प्रा. अजय एस. गाढे यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला.

संस्थेच्या संचालक व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन!

पीसीसीओईच्या महासंचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या मोठ्या यशाबद्दल संपूर्ण पीसीसीओई टीमचे अभिनंदन केले आहे.

पीसीसीओईच्या संशोधन क्षेत्रात आणखी उंच भरारीची तयारी!

पीसीसीओईकडून संशोधन, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि बौद्धिक संपदेच्या नोंदीसाठी अधिक प्रयत्न केले जात असून, भविष्यात आणखी नवनवीन संशोधन व पेटंट नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हा पुरस्कार केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.