Home Breaking News पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी सहशहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे यांचे दुःखद निधन;...

पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी सहशहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे यांचे दुःखद निधन; प्रशासन व अभियंता वर्गात शोककळा!

92
0

पिंपरी चिंचवड –पिंपरी चिंचवड महापालिकेतील एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ, नम्र व अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. ज्ञानदेव जुंधारे (वय ५९) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने महापालिकेच्या प्रशासनात आणि अभियंता वर्गात शोककळा पसरली आहे.

डॉ. जुंधारे हे महापालिकेत अनेक वर्षे सेवेत कार्यरत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शहर विकासासाठी केलेले नियोजन, शहरी पायाभूत सुविधांचे जाळे मजबूत करण्यासाठी घेतलेले निर्णय आणि प्रामाणिकपणे बजावलेली जबाबदारी यामुळे त्यांना अधिकारी व कर्मचारी वर्गात मोठा आदर मिळत असे. ते नेहमीच शांत, संयमी आणि सर्वांना मदतीला तत्पर असणारे अधिकारी म्हणून ओळखले जात.

सेवानिवृत्तीनंतर ते मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त झाले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

 त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने एक जबाबदार कुटुंबप्रमुख हरपल्याची भावना त्यांच्या नातेवाईक, सहकारी आणि हितचिंतकांत आहे.

 मूळचे प्रवरानगर तालुक्यातील कोळपेवाडी (जिल्हा अहिल्यानगर) येथील असलेले डॉ. जुंधारे यांचा अंत्यविधी आज (मंगळवारी) सकाळी त्यांच्या मूळगावी अत्यंत शोकमय वातावरणात पार पडणार आहे.

 अनेक सहकाऱ्यांनी सोशल मिडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहत, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण केले आहे. त्यांनी शहरी अभियांत्रिकी क्षेत्रात दाखवलेले नेतृत्व व योगदान कायम स्मरणात राहील, असे सहकारी अभियंत्यांनी नमूद केले.

महापालिकेच्या इतिहासात डॉ. जुंधारे यांचे नाव एक समर्पित आणि आदर्श प्रशासक म्हणून कोरले गेले आहे. त्यांच्या कार्याचा ठसा महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये आजही जाणवतो.