पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) अंतर्गत येणाऱ्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCOE), निगडी या प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उज्वल करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टीम मेव्हरिक इंडिया या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील व्हॅन नुयस, कॅलिफोर्निया येथे झालेल्या जागतिक एअरोडिझाईन स्पर्धेत आशिया खंडात दुसरा व संपूर्ण जगात सहावा क्रमांक पटकावून अभिमानास्पद यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत जगभरातील ७० हून अधिक विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या डिझाईन कौशल्य, सादरीकरण, कार्यक्षमतेचा आढावा आणि तांत्रिक विचारांवर आधारित होती. या सर्व निकषांमध्ये पीसीसीओईच्या टीम मेव्हरिक इंडियाने आपली प्रतिभा सिद्ध करत उल्लेखनीय कामगिरी केली.
डिझाईन रिपोर्ट विभागात या संघाने सर्वाधिक गुण मिळवून जागतिक स्तरावर दुसरे स्थान मिळवले. तसेच मिशन परफॉर्मन्स श्रेणीत सहावे स्थान पटकावत भारतीय अभियांत्रिकी कौशल्याला जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळवून दिली.
संघामध्ये द्वैपायन धर (कर्णधार), तन्मय राजपूत, रोहित तांबडे, महेश्वर ढोणे, भूमिका शेखावत, अंशुल शेळके, विशालराजू लागुडुवा, मृदुला लेले, निष्ठा देसाई, हर्षवर्धन करंजे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या यशामागे डॉ. पी. आर. काळे, डॉ. किशोर किनगे, डॉ. लीना शर्मा, डॉ. राहुल पाटील आणि डॉ. पी. ए. देशमुख यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या संघाची सुरुवात अवघ्या पाच वर्षांपूर्वी अत्यंत मर्यादित संसाधनांमध्ये झाली होती. प्रारंभीचे प्रयोग यशस्वी न झाले तरी या विद्यार्थ्यांनी हार मानली नाही. त्यांनी अपयशातून शिकत, तांत्रिक कौशल्यात प्राविण्य मिळवत आपल्या कल्पकतेच्या जोरावर एक नवा इतिहास घडवला. त्यांच्या चिकाटी, मेहनत, आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळेच आज हे यश शक्य झाले आहे.
या यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी टीम मेव्हरिक इंडियाच्या सर्व सदस्यांचे व त्यांचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. चंदन इंगोले यांचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पीसीसीओईच्या या यशामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला अभिमान वाटत आहे. भारतीय युवा विद्यार्थ्यांचे जागतिक मंचावरील प्रतिनिधित्व हे शिक्षण, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रासाठी सकारात्मक दिशा दर्शवणारे आहे.