Home Breaking News गहुंजेतील नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी; आमदार सुनील शेळके...

गहुंजेतील नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी; आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजन

112
0

गहुंजे (ता. मावळ) येथील नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात आज, शनिवारी (१२ एप्रिल) श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. वामनभाऊ हाउसिंग सोसायटी परिसरात वसलेले हे मंदिर संपूर्ण मावळ तालुक्यात एक महत्त्वाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. या शुभदिनी मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

या विशेष प्रसंगी मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील (अण्णा) शेळके यांनी मंदिराला भेट दिली. त्यांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार शेळके यांनी भाविकांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले आणि उत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “ही पवित्र जागा केवळ एक मंदिर नसून लोकांच्या श्रद्धेचा आणि नवसांचा केंद्रबिंदू आहे.”

हे मंदिर “नवसाला पावणारा हनुमान” म्हणून प्रसिद्ध आहे. स्थानिक तसेच आजूबाजूच्या गावातील भाविक येथे नवस करत असतात. एका भाविकाने सांगितलेल्या अनुभवानुसार, त्याच्या जीवनातील अनेक अडथळे आणि अडचणी या मंदिरात नवस केल्यानंतर एका महिन्यात दूर झाल्या. अशा असंख्य अनुभवांमुळे हे मंदिर भाविकांमध्ये विश्‍वासाचे प्रतीक बनले आहे.

या मंदिराचे व्यवस्थापन गेली अनेक वर्षे वामनभाऊ हाउसिंग सोसायटीतील कार्यकर्ते – दीपक शहाणे, राजेंद्र खाडे, रामेश्वर बडे, नवनाथ बडे, राजन बडे, लहू खंडारे, बाबासाहेब बडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून अत्यंत नियोजनबद्धपणे केले जाते. त्यांच्या परिश्रमामुळे दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्सवात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी केली जाते.

यावर्षीही भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने सजवण्यात आला होता, आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचीही योजना करण्यात आली होती. गजानन ढोलताशा पथकाने सादर केलेल्या वादनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून गेले होते.

भाविकांना नवस फेडण्यासाठी, दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. गहुंजे येथील हे हनुमान मंदिर वर्षानुवर्षे भक्तांच्या श्रद्धेचा किल्ला ठरले आहे आणि भविष्यातही ते अधिक भक्तिमय बनत जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.