सायबर गुन्हेगारांकडून पुण्यातील एका नामांकित कंपनीची तब्बल ₹४०,९०,६०५/- रुपयांची फसवणूक झाली होती. मात्र सायबर पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे सदर रक्कम कंपनीला परत मिळवून देण्यात यश आले आहे.
फसवणुकीचा प्रकार:
या प्रकरणात अज्ञात व्यक्तीने एका नामांकित कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) असल्याचे भासवून कंपनीला व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क केला. “मी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे, आणि हा माझा वैयक्तिक क्रमांक आहे” असे सांगत दुसऱ्या कंपनीला पेमेंट करण्यासाठी ₹४०,९०,६०५/- रुपयांची रक्कम एका बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवून सदर रक्कम त्या बँक खात्यात पाठवली. मात्र हे फसवणुकीचे जाळे असल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.
सायबर पोलिसांची तत्पर कारवाई:
पुणे सायबर पोलीस स्टेशनने तातडीने तपासाची चक्रे फिरवत परराज्यातील बँकेशी पत्रव्यवहार केला. स्थानिक नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वेळोवेळी पाठपुरावा करत फसवणुकीची रक्कम गोठवण्यात आली आणि ती तक्रारदार कंपनीला परत मिळवण्यात यश आले.
पोलीस अधिकारी आणि टीमचे योगदान:
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे, तसेच सायबर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
नागरिकांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शक उपाय:
✅ अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या मेसेजवर तात्काळ विश्वास ठेवू नका. ✅ कुणीही तुमचा बॉस किंवा ओळखीची व्यक्ती असल्याचे सांगत पैशाची मागणी केल्यास, आधी संबंधित व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क साधा. ✅ संशयास्पद कॉल किंवा मेसेज आल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधा.
पुणे सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका नामांकित कंपनीला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचविण्यात मोठे यश मिळाले आहे.