मुंबई – देशाचे आदरणीय उपराष्ट्रपती मा.श्री. जगदीप धनखड, महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल मा.श्री. सी.पी. राधाकृष्णन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील ‘दि रॉयल ऑपेरा हाऊस’ येथे ‘मुरली देवरा मेमोरियल लेक्चर्स’ या विशेष व्याख्यानमालेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. शिवसेना खासदार श्री. मिलिंद देवरा आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत नेते स्व. मुरली देवरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘नेतृत्व आणि प्रशासन’ या महत्त्वपूर्ण विषयावर मान्यवर विचारवंत, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी आपले विचार मांडणार आहेत. या संवादातून मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दिशा ठरविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रभावी नेतृत्वाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “नेतृत्व हे केवळ निर्णय घेण्याचे साधन नसून, समाजातील बदल घडविण्याची ताकद आहे. प्रशासन आणि नेतृत्व एकत्र आल्यास देशाच्या प्रगतीचा वेग दुपटीने वाढतो.”
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी स्वर्गीय मुरली देवरा यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “त्यांचे योगदान हे देशाच्या राजकीय आणि आर्थिक विकासासाठी मोलाचे ठरले आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासन आणि नेतृत्व यामधील समतोल साधण्याच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “सरकारी यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व समंजसपणे आणि पारदर्शकपणे चालवल्यासच लोकशाहीला खरी ताकद प्राप्त होते.”
या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि समाजातील विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. या व्याख्यानमालेतून राज्यभरात अर्थपूर्ण संवादाला चालना मिळेल आणि भविष्यातील प्रभावी नेतृत्व घडण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.