Home Breaking News परीक्षा पे चर्चा’मध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंभळे पाटील...

परीक्षा पे चर्चा’मध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंभळे पाटील यांचा विशेष संवाद!

46
0

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाच्या अंतर्गत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. परीक्षांचा तणाव कसा टाळावा, योग्य करिअर कसे निवडावे आणि अपयशाला धैर्याने कसे सामोरे जावे याविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

विशेष म्हणजे, त्यांनी पारंपरिक व्यासपीठावर बसण्याऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या मध्यात बसून त्यांच्याशी संवाद साधला. शिक्षण, खेळ, आवडीनिवडी आणि भविष्यातील उद्दिष्टे यासंदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सांगितले, “फक्त आई-वडिलांच्या सांगण्यावरून अभ्यास करू नका, तर अभ्यासाची आवड जोपासा आणि यश तुमच्या पायाशी येईल.”

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि करिअर घडवण्यावर भर

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे स्पष्ट लक्ष्य निश्चित करून त्याकडे प्रामाणिक प्रयत्न करावेत, असा सल्ला त्यांनी दिला. “ध्येय निश्चित करा, सातत्य ठेवा आणि स्वबळावर यश मिळवा,” असे ते म्हणाले. त्यांनी स्वतःच्या संघर्षमय प्रवासाचे उदाहरण देत सांगितले की, नांदेडमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवात करून प्रशासन सेवेत प्रवेश करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास चिकाटी व मेहनतीचा होता.

क्रीडा क्षेत्राचा विकास आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य

यावेळी विद्यार्थ्यांना खेळाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. “महानगरपालिका विद्यार्थ्यांना खेळात आघाडीवर राहण्यासाठी उत्तम प्रशिक्षण, साधने आणि सुविधा पुरवण्यास कटिबद्ध आहे. तुम्ही तुमच्या खेळातील कामगिरीद्वारे शहराला राष्ट्रीय ओळख मिळवून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, माध्यमिक शिक्षण अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापक जयराम वायल, क्रीडा प्रमुख ऋषिकांत वचकाळ आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता.

मुख्याध्यापक जयराम वायल यांनी शाळेच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी कामगिरीचा आढावा सादर केला.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंभळे पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

“आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. शिक्षण आणि क्रीडा यांचा समतोल साधून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजच्या चर्चेतून विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेण्याची संधी मिळाली असून, त्यानुसार आम्ही योजनांची आखणी करू.”

– प्रदीप जंभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांचा संदेश

“पीसीएमसीच्या क्रीडा प्रबोधिनी शाळा ही केवळ शैक्षणिक संस्था नसून ती भावी खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. शिक्षण व क्रीडा सुविधांचा योग्य संगम साधून विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण केली जात आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.”

– विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका