तळेगाव: संरक्षण खात्यात नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवून चार जणांची तब्बल ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट नियुक्तीपत्र, प्रवेशपत्र आणि सरकारी शिक्क्यांचा वापर करून आरोपीने हा प्रकार केला. याप्रकरणी सुभाष मगन पवार (वय ५१, रा. खालुंब्रे, ता. खेड) याला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कविता कैलास टिळेकर (वय ४०, रा. माळवाडी, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १५ ऑक्टोबर २०२३ ते ४ मार्च २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी आरोपी पवारच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कसे केली फसवणूक?
🔹 आरोपी सुभाष पवार हा तळेगाव डेपोमध्ये ‘पॅकर’ या पदावर कार्यरत होता. 🔹 तो गेल्या वर्षभरापासून कामावर गैरहजर असून, संरक्षण खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत होता. 🔹 फिर्यादीसह अन्य तिघांना संरक्षण खात्यात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून ४३ लाख रुपये उकळले. 🔹 त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आर्मीचे सिम्बॉल असलेली बनावट पत्रे, खोटे शिक्के आणि बनावट नियुक्तीपत्रे तयार केली. 🔹 मात्र, प्रत्यक्षात नोकरी न लावता आरोपीने पैसे घेऊन फसवणूक केली.
पोलीस तपासात कोणते नवे धागेदोरे हाती?
🔹 देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी काही जण फसवले गेले असण्याची शक्यता आहे. 🔹 पोलिसांकडून आरोपीकडे कसून चौकशी सुरू असून, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे इतरांना गंडा घातला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. 🔹 ४३ लाख रुपयांपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचा संशय असून, गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचीही तपासणी सुरू आहे.
आरोपीच्या जाळ्यात आणखी कोणी अडकलंय का? पोलिसांचा तपास सुरू!
🔹 पोलिसांकडून सुभाष पवारच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे. 🔹 या प्रकरणातील आणखी काही बळी पडलेल्यांनी समोर यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 🔹 सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये गमावणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कोणत्याही सरकारी नोकरीसाठी फक्त अधिकृत प्रक्रियेशी संलग्न राहा आणि अशा बनावट योजनांना बळी पडू नका!