Home Breaking News चिखलीत घुसखोरीचा प्रकार उघड! बांगलादेशी महिलेसह पतीला अटक, पोलिसांची मोठी कारवाई

चिखलीत घुसखोरीचा प्रकार उघड! बांगलादेशी महिलेसह पतीला अटक, पोलिसांची मोठी कारवाई

88
0

पिंपरी-चिंचवड– चिखली पोलिसांनी मोठी कारवाई करत एका बांगलादेशी घुसखोर महिलेसह तिच्या भारतीय पतीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, ही महिला पर्यटन व्हिसावर भारतात आली होती आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती अवैधरीत्या येथे राहत होती. याशिवाय, तिने एका स्थानिक भंगार व्यावसायिकाशी विवाह करून भारतातच स्थायिक होण्याचा प्रयत्न केला होता.

काय आहे प्रकरण?

अटक करण्यात आलेले आरोपी मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख (३३, रा. तळवडे, मूळ उत्तर प्रदेश) आणि त्याची बांगलादेशी पत्नी (३०) हे चिखलीतील कुदळवाडी येथे राहत होते. विशेष म्हणजे, बांगलादेशी महिलेला व्हिसाच्या मुदतीनंतर मायदेशी परतणे आवश्यक असतानाही ती भारतातच राहिली. तिचा पहिला पती बांगलादेशात वेल्डिंगचे काम करतो, पण तरीही ती वारंवार भारतात येत होती.

फेसबुकवरून झाली ओळख, विवाह करून भारतात वास्तव्यास!

सन २०१७ पासून ती पर्यटन व्हिसावर भारतात येत होती आणि काही काळ मुंबईतही राहिली. दरम्यान, तिची ओळख फेसबुकद्वारे मोहम्मद राणासोबत झाली. डिसेंबर २०२१ मध्ये ती पुन्हा पर्यटन व्हिसावर भारतात आली आणि चिखलीत मोहम्मद राणाला भेटली. त्या वेळी ती आपल्या पहिल्या पतीपासून झालेल्या १६ वर्षीय मुलालाही सोबत घेऊन आली होती.

भारतीय नागरिक असूनही कायदा तोडला, पोलिसांची मोठी कारवाई

मोहम्मद राणाला महिला बांगलादेशी असल्याची पूर्ण माहिती होती, तरीही त्याने तिच्याशी विवाह केला. दोघांना एक मुलगा असून, ती गेल्या सव्वातीन वर्षांपासून चिखलीत वास्तव्यास होती. या प्रकरणाची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी धडक कारवाई करत महिलेसह राणाला अटक केली आणि तिच्या १६ वर्षीय मुलालाही ताब्यात घेतले.

घुसखोरांसाठी भारतात प्रवेश करण्याचा नवीन मार्ग?

हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून परदेशी नागरिक भारतात स्थायिक होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, आणखी काही घुसखोर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील तपास सुरू

या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गोमारे करत आहेत. या प्रकरणी आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.