Home Breaking News चाकणमध्ये पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला; डीसीपींनी जीवावर खेळत टोळीला जेरबंद केले!

चाकणमध्ये पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला; डीसीपींनी जीवावर खेळत टोळीला जेरबंद केले!

122
0

चाकण – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जीवाची बाजी लावत एका धोकादायक दरोडेखोर टोळीला जेरबंद केलं आहे. चिंचोशी गावात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दरोडेखोराने पोलीस उपायुक्त (DCP) शिवाजी पवार यांच्या छातीवर कोयत्याने हल्ला केला, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रसन्न जराड यांच्या खांद्यावर वार झाला. पोलीस उपायुक्तांनी प्रतिकार करत गोळीबार केला आणि अखेर दोघा दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात यश मिळवलं.

धोकादायक दरोडेखोर टोळीला अटक

गेल्या काही दिवसांपासून चाकण परिसरात दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. काही दिवसांपूर्वीच या टोळीने एका पोलिसाच्या घरी दरोडा टाकला होता. तसेच बहुळ गावात एका पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

पोलिसांना माहिती मिळाली होती की, याच टोळीतील उर्वरित दोन गुन्हेगार चिंचोशी गावात पुन्हा दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे डीसीपी शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली API प्रसन्न जराड आणि आठ पोलिसांचे पथक रात्री दहा वाजता गावात दाखल झाले. मंदिर परिसरात दबा धरून बसलेल्या दोन संशयितांवर लक्ष ठेवत पोलिसांनी सापळा रचला.

चकमकीचा थरार – डीसीपींवर थेट हल्ला!

रात्री सव्वा बाराच्या सुमारास पोलिसांनी संशयितांना शरण येण्याचे आदेश दिले. मात्र, दोघांनी पलायनाचा प्रयत्न केला. डीसीपी पवार आणि API जराड यांनी त्यांना अडवलं. यावेळी एका दरोडेखोराने थेट कोयता काढला आणि डीसीपी पवार यांच्या छातीवर वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे डीसीपी काहीसे मागे हटले, पण वार चुकवू शकले नाहीत. त्यांच्या छातीला गंभीर जखम झाली.

डीसीपींचा प्रतिकार – दरोडेखोराला जमिनीवर कोसळवलं

आपल्यावर हल्ला होत असतानाही डीसीपी पवार यांनी संयम न सोडता बंदूक काढली आणि दरोडेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. पहिली गोळी चुकवण्यात दरोडेखोर यशस्वी ठरला. मात्र, दुसऱ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरावर डीसीपींनी दुसरी गोळी झाडली. गोळी थेट दरोडेखोराच्या पायावर लागली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याच वेळी, API प्रसन्न जराड यांनी दुसऱ्या गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यानेही कोयत्याने हल्ला करत जराड यांच्या खांद्यावर गंभीर जखम केली.

पोलिसांनी २० मिनिटांत संपवला थरार!

या संपूर्ण घटनाक्रमात जवळपास २० मिनिटे पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार संघर्ष झाला. अखेर, जखमी अवस्थेत असलेल्या दरोडेखोराला पोलिसांनी अटक केली, तर त्याचा अल्पवयीन साथीदारही ताब्यात घेण्यात आला. दोघांना पोलीस कोठडीत ठेवून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांचे शौर्य – नागरिकांतून कौतुकाची लाट

डीसीपी शिवाजी पवार आणि API प्रसन्न जराड यांनी अत्यंत धाडसी कामगिरी करत या दरोडेखोर टोळीचा निःपात केला. त्यांच्या या धाडसाची संपूर्ण पोलिस दलातून आणि नागरिकांमधून प्रशंसा होत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, डीसीपी पवार यांच्या छातीवर पाच टाके पडले असून, ते सध्या धोक्याबाहेर आहेत. API प्रसन्न जराड यांनाही मोठी इजा झाली असून, उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे चाकण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात भीती निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांची दहशत संपुष्टात आली आहे. पोलीस आयुक्तांनीही या यशस्वी मोहिमेबद्दल संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.