मुंबई : राज्यात अवैध हुक्का पार्लरवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. २०१८ पासून तंबाखूजन्य हुक्का पार्लर व्यवसायावर बंदी असतानाही काही ठिकाणी “हर्बल हुक्का”च्या नावाखाली या व्यवसायाला बेकायदेशीरपणे चालना दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आता अवैध हुक्का पार्लर चालविणाऱ्या व्यक्तींवर अधिक कठोर कारवाई होणार असून, तिसऱ्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास तो अजामीनपात्र गुन्हा ठरेल. तसेच, दुसऱ्यांदा गुन्हा करणाऱ्यांना कैदेची शिक्षा होईल आणि संबंधित उपहारगृहाचा परवाना रद्द केला जाईल. तर, तिसऱ्यांदा गुन्हा झाल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल आणि कठोर कारवाई केली जाईल.
अवैध हुक्का पार्लरविरोधात पोलिसांना कडक आदेश
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, त्यांच्या कार्यक्षेत्रात जर अवैध हुक्का पार्लर चालत असल्याचे आढळले आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही, तर संबंधित पोलिसांवरदेखील कारवाई केली जाईल.
यासंदर्भात भाजप आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत संजय केळकर, सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले, सिद्धार्थ शिरोळे आणि आशिष देशमुख या आमदारांनी सहभाग घेतला.
ई-सिगारेटवरही प्रभावी कारवाई
मुख्यमंत्र्यांनी ई-सिगारेटच्या वाढत्या व्यसनाविषयी चिंता व्यक्त केली. “तरुणांमध्ये ई-सिगारेट स्टाईल स्टेटमेंट बनत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. ई-सिगारेटवर बंदी असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन पावले उचलणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
राज्यात विशेष मोहीम राबवणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, राज्यात विशेष मोहीम राबवून अवैध हुक्का पार्लरविरोधात कठोर कारवाई केली जाईल. “हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर देखील लक्ष ठेवले जाईल. या संदर्भात आतापर्यंत ५० गुन्हे दाखल झाले असून, १.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
सरकारचा इशारा – नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षेसाठी तयार राहा!
राज्यात अवैध हुक्का पार्लरवर प्रतिबंध आणण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेमुळे हुक्का पार्लर चालविणाऱ्या बेकायदेशीर व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आता या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जेलची हवा खावी लागेल आणि त्यांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद होईल!