अमरावती : अमरावतीतील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमरावती विमानतळाला अखेर नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (DGCA) एरोड्रम परवाना प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता अमरावती विमानतळावरून हवाई उड्डाणांसाठीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे.
अमरावती-मुंबई हवाई सेवा सुरू होणार
या परवान्यानंतर अमरावती विमानतळावरून अलायन्स एअरची ‘अमरावती-मुंबई-अमरावती’ ही विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा या महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र सुपूर्द
डीजीसीएकडून देण्यात आलेले हे महत्वाचे प्रमाणपत्र महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या (MADC) व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले.
हवाई सेवेमुळे विकासाला गती
अमरावतीतील व्यावसायिक, विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटक यांना हवाई प्रवासामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्रात यामुळे नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.