Home Breaking News मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन! सांस्कृतिक वैभवाची मोठी पर्वणी

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन! सांस्कृतिक वैभवाची मोठी पर्वणी

101
0

पिंपरी-चिंचवड : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका गुरुवारी विविध उपक्रमांचे आयोजन करीत आहे. या विशेष कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

मुख्य कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ

हा भव्य सोहळा मोरवाडी, पिंपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. याचे उद्घाटन सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ, तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर मांडेकर, शंकर जगताप आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर आदी वरिष्ठ अधिकारी देखील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. महाराष्ट्रातील विविध बोली भाषांमधील गीते, नृत्य आणि लोककलेचे सादरीकरण होणार आहे.

सकाळी १०.३० वाजता ‘सुलेखन कार्यशाळा’ होणार असून, सुप्रसिद्ध सुलेखनकार शरद कुंजीर उपस्थितांना सुलेखनाचे महत्व पटवून देतील आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करतील.

यानंतर शिवचरित्र किर्तनकार ज्ञानेश्वरी ढगे यांचे भावस्पर्शी किर्तन होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आदर्श आणि मराठी भाषेचे योगदान यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान आणि लोककला सादरीकरण

दुपारी १२ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. शिवप्रसाद महाले हे ‘युवा शक्तीची स्वर्णिम भारताकडे वाटचाल’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. युवकांना राष्ट्र उभारणीसाठी योगदान देण्याची प्रेरणा देणारे हे व्याख्यान विशेष आकर्षण ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या सांगतेला दुपारी १ वाजता राष्ट्रीय भारूडकार हमीद अमीन सय्यद यांच्या पारंपरिक भारुड सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणाला नागरिकांकडून मोठी उत्सुकता आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन

मराठी भाषेचे संवर्धन आणि गौरव करणाऱ्या या विशेष कार्यक्रमांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला बळ द्यावे, असे आवाहन महापालिकेच्या मराठी भाषा समन्वय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.