
महाड (रायगड): महाड एमआयडीसी मुख्य रस्त्यावर दोन दुचाकींच्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. या अपघातामागे रस्त्यावरील रस्तारुंदीकरणाच्या कामावेळी आवश्यक सूचना फलकांचा अभाव आणि स्ट्रीट लाइट नसल्यामुळे वाढलेल्या धोकादायक परिस्थितीला जबाबदार ठरवले जात आहे.
घटनेचे तपशील:
शनिवारी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास नागलवाडी गावातील शहीद अर्जुन कनुबाई स्मारकाजवळ हा अपघात झाला. दुचाकीस्वार वसीम हैदर अन्सारी (वय २६) आणि त्याचा मित्र दुचाकी क्रमांक MH 38 AH 3635 वरून जात असताना त्यांनी एका रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी क्रमांक MH 06 CN 7176 ला धडक दिली. या अपघातात वसीम अन्सारीचा जागीच मृत्यू झाला, तर हर्षल भालेकर (वय २२) गंभीर जखमी झाला.
जखमींची प्रकृती आणि पुढील उपचार:
हर्षल भालेकरला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, पनवेल येथे हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. वसीम अन्सारीसोबत दुचाकीवर असलेला सैलानी खेरवाडी किरकोळ जखमी झाला आहे.
रस्त्यावरील हलगर्जीपणा ठरत आहे जीवघेणा:
महाड एमआयडीसीत सध्या रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सावधानतेचे सूचना फलक लावलेले नाहीत. तसेच, गेल्या कित्येक महिन्यांपासून मुख्य रस्त्यावर स्ट्रीट लाइट नसल्याने अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांकडून एमआयडीसी प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. रस्तारुंदीकरणाच्या कामावेळी योग्य पद्धतीने सुरक्षा उपाययोजना आणि सूचना फलकांची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
पोलीस तपास सुरू:
या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अंबरगे करत आहेत. अपघाताच्या कारणांचा आणि संबंधित जबाबदार घटकांचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे.