Home Breaking News पाठीमागील प्रवाशांनाही हेल्मेट बंधनकारक – आता नियम अधिक कठोर,

पाठीमागील प्रवाशांनाही हेल्मेट बंधनकारक – आता नियम अधिक कठोर,

43
0
Now helmet is compulsory for co passenger along with two wheeler rider. | Photo Credit: PERIASAMY

पुणे : दुचाकी वाहन चालकांप्रमाणेच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात हेल्मेटशिवाय दुचाकी आणि पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांच्या अपघातांच्या वाढत्या घटनांचा विचार करून परिवहन विभागाच्या वरिष्ठ पोलीस महासंचालकांनी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, हेल्मेट न घालणाऱ्या चालक आणि प्रवाशांवर स्वतंत्र प्रकरण नोंदवले जाईल व ई-चलन मशीनमध्ये यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे.

अपघातांची वाढती संख्या…
राज्यात गेल्या पाच वर्षांतील अपघातांचा आढावा घेतल्यावर असे दिसून आले आहे की, हेल्मेटशिवाय वाहन चालविणाऱ्या आणि पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांच्या अपघातांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हेल्मेट वापर सक्तीचा निर्णय घेतला आहे.

कायदेशीर तरतुदींनुसार सक्ती…
“मोटार वाहन कायदा, 1988” च्या कलम 128 आणि 129 अन्वये दुचाकी वाहनचालक व प्रवाशांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षक यांना हा आदेश पाठवण्यात आला असून त्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ई-चलन मशीनमध्ये सुधारणा…
सध्याच्या ई-चलन प्रणालीत वाहन चालक आणि प्रवाशांसाठी एकाच प्रकारच्या विभागाखाली प्रकरणे नोंदवली जात होती. मात्र, आता हेल्मेट न घालणाऱ्या चालक आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रकरणे नोंदवण्यासाठी ई-चलन प्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालक व प्रवाशांना अधिक जबाबदारीची जाणीव होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई…
वाहतूक पोलीस विभागाकडून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई सुरू आहे. आता पाठीमागे बसणाऱ्या हेल्मेटशिवाय प्रवाशांवरही कारवाई केली जाणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेल्मेटसाठी जनजागृती…
वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हेल्मेट हा केवळ नियम नसून, तो आपल्या जीवाची सुरक्षा करणारा महत्त्वाचा भाग आहे, यावर भर देण्यात येणार आहे.