आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात जनजागृती करावी तसेच मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आज झालेल्या जनसंवाद सभेच्या माध्यमातून करण्यात आले.
नागरिकांशी सुसंवाद साधने, तक्रारींचे निराकरण करणे तसेच नागरिक आणि महापालिका यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशान्वये महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज जनसंवाद सभा पार पडली. महापालिकेने नियुक्त केलेल्या मुख्य समन्वय अधिका-यांनी या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवले. आज झालेल्या जनसंवाद सभेत अ,ब,क,ड,,फ,ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १८,७,५,६,४,११,९ आणि ९ अशा एकूण ६९ तक्रार वजा सूचना नागरिकांनी मांडल्या.
आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध सूचना मांडल्या. यामध्ये ड्रेनेजलाईन स्वच्छ करावी, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता राखावी, कच-याचे योग्य व्यवस्थापन करावे, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी, विविध ठिकाणी असलेले सार्वजनिक नळ दुरुस्त करावेत, रस्त्यांमध्ये गतिरोधक उभारावेत, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा आशा विविध तक्रार वजा सूचनांचा समावेश होता.

