Home Breaking News बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहावा आरोपी नवी मुंबईत अटक; मुंबई क्राइम ब्रँचची...

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहावा आरोपी नवी मुंबईत अटक; मुंबई क्राइम ब्रँचची मोठी कारवाई.

154
0

मुंबई, बेलापूर : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दहावा आरोपी भगवतसिंग ओमसिंग (वय ३२, जगत गाव, उदयपूर, राजस्थान) याला रविवारी नवी मुंबईतील बेलापूर येथून अटक केली आहे. या आरोपीने राजस्थानमधून बंदुकीची व्यवस्था करून ती इतर आरोपींपर्यंत पोहोचवली होती. त्याला इस्पलानेड न्यायालयात हजर केले असता, २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हत्या प्रकरणाचा तपशील:
१२ ऑक्टोबर रोजी बांद्रा (पूर्व), खेर नगर भागात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी आरोपी भगवतसिंग हा बीकेसी येथील आपल्या घरात टीव्हीवर बातम्या पाहत होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भगवतसिंगने अटक आरोपी राम कानोजियाला मुंबईत राहण्यासाठी जागा, वाहन आणि शस्त्र वाहतूक करण्यासाठी मदत केली होती.

भगवतसिंग गेल्या आठ वर्षांपासून बीकेसी भागात कबाडाचा व्यवसाय करत होता. गोळीबाराच्या घटनेनंतर, पोलिस त्याच्यावर लक्ष ठेवतील या भीतीने तो बीकेसी सोडून बेलापूरला स्थलांतरित झाला आणि तेथे नव्या कबाड व्यवसायासाठी जागा शोधू लागला. त्याने आपले मूळ गाव उदयपूरला परत जाणे टाळले, कारण पोलिस त्याचा मागोवा घेत असतील अशी त्याला शंका होती.

दोन अडीच महिन्यांपूर्वी, राम कानोजिया, जो पनवेलमध्ये राहत होता, तो उदयपूरला शस्त्र खरेदीसाठी गेला होता. तेव्हा भगवतसिंगने त्याची राहण्याची आणि वाहतुकीची सोय केली होती. परंतु, उदयपूरमध्ये शस्त्र मिळाली नाही म्हणून ते दोघे सुरतला गेले. नंतर, उदयपूरमध्ये शस्त्राची व्यवस्था झाल्यावर, भगवतसिंगने कानोजियाला ते सुरक्षितपणे मुंबईत कसे पोहोचवायचे याचे मार्गदर्शन केले. तपासादरम्यान ही माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक मोबाइल फोन जप्त केला असून, तो विवाहित आहे आणि त्याला मुलं आहेत.

तपासयंत्रणेची मोठी कारवाई, आरोपी अद्याप फरार
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.