कोल्हापूरच्या विकासासाठी राज्य सरकारकडून जवळपास चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी तब्बल 3,200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी 277 कोटी, अमृत 2.0 योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 152 कोटी, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 139 कोटी निधी दिला आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 25 कोटी, पंचगंगा नदी घाट सुशोभिकरणासाठी 3 कोटी 50 लाख, आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुलभूत सुविधा उभारण्यासाठी 25 कोटी असा निधी मंजूर झाला आहे.
रंकाळा तलाव येथे म्युझिकल फाउंटेन, आकर्षक विद्युत रोषणाई, आणि मिनिचर पार्क तयार करण्यासाठी 5 कोटी, 3 कोटी 31 लाख, आणि 3 कोटी 50 लाख रुपये दिले गेले आहेत. याशिवाय, विविध ठिकाणी हेरिटेज लाईट बसविणे, ओपन जिम आणि उद्यानांमध्ये व्यायामाचे साहित्य उभारणे, रस्ते डांबरीकरण करणे अशी कामेदेखील मंजूर करण्यात आली आहेत.
शहरातील हनुमान तलावाचे संवर्धन, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यानाची उभारणी, शाहू उद्यान विकसित करणे आणि ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी विविध ठिकाणी आधुनिक कचरा संकलक बसविण्याचे नियोजनही या निधीतून केले गेले आहे.या सर्व प्रकल्पांमुळे कोल्हापूरच्या विकासाला नवीन दिशा मिळणार आहे.