उद्धव ठाकरे कणकवलीच्या सभेत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे ज्याला ‘गेट आउट’ म्हणाले होते, त्यालाच भाजपाने इथला उमेदवार केलं आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (३ मे) कणकवली येथे जाहीर सभा घेऊन भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक (भाजपा) आता देशातील महत्त्वाचे प्रश्न विसरून गेले आहेत. फक्त काँग्रेसवर टीकाटिप्पणी चालू आहे. मोदी म्हणतायत, ‘आता काँग्रेस काय करणार? काँग्रेस तुमची संपत्ती काढून घेणार आणि ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांच्यात वाटून टाकणार’. मुळात तुम्हाला राजकारणात मुलं होत नाहीत, त्यावर आम्ही काय करू शकतो? त्यात आमचा काय दोष? तुम्हाला राजकारणात मुलं होत नाहीत म्हणून तुम्ही आमची मुलं कडेवर घेऊन फिरत आहात. ते करताना भाजपाचं कचरा उचलणाऱ्या गाडीसारखं झालंय. या निवडणुकीत भाजपाची कचरा उचलणारी गाडी फिरतेय. मी असं कधीच पाहिलं नव्हतं. पण भाजपाच्या काळात हे पाहायला मिळतंय. त्यांनी चक्क कचऱ्याचं प्रदर्शन लावलं आहे. सगळा कचरा त्यांनी जमा केला आहे.

