महात्मा फुले यांचा नाशिकमध्ये पूर्णाकृती पुतळा नाही. तो पुतळा बसवण्याचं काम नाशिकमध्ये सुरु आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते. ते ब्राह्मण्यवादाच्या विरोधात होते. त्यांच्या लढ्याला अनेक ब्राह्मणांनीही साथ दिली होती असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त केलं. तसंच छगन भुजबळ यांना नाशिकच्या जागेचं काय, तुम्ही कमळ चिन्हावर लढणार का? हे विचारलं असता त्यांनी त्या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
“महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी जात, धर्म, राज्य याच्या पलिकडे जाऊन मानव म्हणून समानतेची वागणूक दिली पाहिजे हे त्यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते. ब्राह्मण्यवादाच्या विरोधात होते. सती प्रथा विरोध, केशवपन विरोध या सगळ्यात अनेक सुधारक ब्राह्मणांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना साथ दिली होती. हे सांगण्याचा उद्देश हा की अंधश्रद्धा आणि अस्पृश्यतेविरोधात फुलेंनी काम केलं. ” असं आज छगन भुजबळ म्हणाले.
नाशिकमधून कमळ चिन्हावर लढणार का?
कमळ चिन्हावर वगैरे मी लढणार ही बातमी चुकीची आणि निराधार आहे. अजित पवारांनी ही जागा मागितली. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की नाशिकची जागा हवी असेल तर घ्या पण छगन भुजबळांना उमेदवारी द्या. या पलिकडे मी फार काही सांगू शकत नाही. त्यामागे काय आहे ते आता महायुतीचे नेते ठरवतील. माझ्याकडे कुणीही चिन्हाबाबत मागणी केली नाही, चर्चा केली नाही काहीही घडलेलं नाही.
राज ठाकरेंचं कौतुक
छगन भुजबळांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “एखादा कार्यकर्ता जरी जोडला गेला तर आपल्याला आनंद होतो. राज ठाकरे तर एका पक्षाचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. निश्चितपणे लोकमानसांवर त्यांचा प्रभाव आहे. ते आल्याने महायुतीची ताकद वाढणार आहे.” असं भुजबळ म्हणाले.